कांकड आरती

उठा पांडुरंगा आतां, दर्शन द्या सकळां ।

झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा ॥ ध्रु० ॥

 

संत साधू मुनी अवघे, झालेली गोळा ।

सोडा शेजसुख आतां, पाहूं द्या मुखकमळा ॥ १ ॥

 

रंगमंडपीं महाद्वारीं, झालीसे दाटी ।

मन उतावेळ, रूप पहावया दष्टीं ॥ २ ॥

 

राई रखुमाबाई, तुम्हां येऊं द्या द्या ।

शेजे हालवुनी जागें करा देवराया ॥ ३ ॥

 

गरुड हनुमंत, उभे पाहती वाट ।

स्वर्गींचे सुरवर घेऊनि आले बोभाट ॥ ४ ॥

 

झाले मुक्तद्वार, लाभ झाला रोकडा ।

विष्णुदास नामा उभा घेऊनी कांकडा ॥ ५ ॥