श्री हरितालिकेची आरती

जय देवी हरितालिके ।
सखी पार्वती अंबिके ॥
आरती ओंवाळीतें ज्ञानदीपकळिके ॥ धृ० ॥

 

हरि अर्धांगीं वससी ॥
जाशी यज्ञा माहेरासी ॥
तेथें अपमान पावसी यज्ञकुंडीं गुप्त होसी ॥ जय० ॥ १ ॥

 

रिघसी हिमाद्रीच्या पोटीं ।
कन्या होसीं तूं गोमटी ॥
उग्र तपश्चर्या मोठी ।
आचरसी उठाउठीं ॥ जय० ॥ २ ॥

 

तपपंचाग्निसाधनें ।
धूम्रपानें अधोवदनें ॥
केलीं बहु उपोषणें ।
शंभु भ्रताराकारणें ॥ जय० ॥ ३ ॥

 

लीला दाखविसी दृष्टीं ।
हें व्रत करिसी लोकांसाठी ॥
पुन्हां वरिसी धूर्जटी ।
मज रक्षावें संकटीं ॥ जय० ॥ ४ ॥

 

काय वर्णूं तव गुण ।
अल्पमति नारायण ॥
मातें दाखवी चरण ।
चुकवावें जन्म मरण ॥ जय० ॥ ५ ॥