श्री मारुतीची आरती

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं |

करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ||

कडाडिलें ब्रम्हांड धाकें त्रिभुवनीं |

सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी || १ ||

 

जय देव जय देव श्री हनुमंता |

तुमचेनि प्रसादें न भी कृतान्ता ||

जय देव जय देव ||

 

दुमदुमलीं पाताळे उठिला प्रतिशब्द |

थरथरला धरणीधर मानीला खेद |

कडकडिले पर्वत उड्डगण उच्छेद |

रामीं रामदासा शक्तीचा शोध ||

जय देव जय देव ||