विघ्नहर्त्याची आरती

उंदिरावरि बैसोनी दुडादुडा  येसी |

हातीं मोदक लाडू घेउनियां खासी ||

भक्तांचे संकटी धांवुनी  पावसी |

दास विनवीती तुझिया चरणासी   || १||

 

जय देव जय देव जय गणराजा |

सकळ देवाआधी तू देव माझा || धृ . ||

 

भाद्रपदमासीं होसी तूं भोळा |

आरक्त पुष्पांच्या घालुनियां माळा ||
कपाळी लावूनि कस्तुरी टिळा |

तेणे तू दिससी सुंदर सांवळा || २ ||

 

प्रदोषाचे दिवशी चंद्र शापीला |

समयी देवें मोठा आकांत केला |

इंदु येवोनी चरणी लागला |

श्रीरामा बहुत शाप दीधला || ३ ||

 

पार्वतीच्या सुता तूं ये गणनाथा |

नेत्र शिणले तूझी वाट पाहतां ||

किती अंत पाहसी बा विघ्नहर्ता |

मजला बुद्धी देई तूं गणनाथा || ४ ||